`लढताना हरलो जरी तरीही हरल्याची खंत नाही… लढाईला माझ्या अंत नाही…’ या उक्तीचा आपल्या जगण्यात वापर करणारे लालबाग-परळ विभागाचे लोकप्रिय माजी आमदार दगडू (दादा) सकपाळ. लालबाग-परळ विभाग म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला… हा बालेकिल्ला अनेक वर्षे लढविला तो माजी आमदार दगडू (दादा) सकपाळ यांनी…
मराठी माणसाच्या मतविभागणीमुळे त्यांचा आमदारकीचा विजय थोडक्यासाठी हुकला पण जिद्द न हारता त्याच तन्मयतेने, तत्परतेने दादांची समाजसेवेची कार्य सुरु आहेत. दादांचा झालेला पराभव म्हणजे इथल्या समाजसेवेला बसलेली खिळ आहे, असे इथल्या जनतेचे मत आहे. पक्षश्रेष्ठींनी विश्वास दाखविला तर आमदारकीच्या निवडणुकीत पुन्हा एकदा भगव वादळ आणू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. आज 5 मार्च रोजी दगडू (दादा) सकपाळ हे वयाच्या 65 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आजही हजारो शिवसैनिक दादांच्या उमेदवारीची वाट बघत आहेत. वाढदिवसानिमित्त या लोकप्रिय नेत्याशी केलेली खास बातचित.
* वयाच्या 65 व्या वर्षात पर्दापण करताना मागे वळून पाहिलं तर काय कमावलं? काय गमावलं?
मागे वळून पाहिलं तर शिवसेना नावाच्या घरात वावर करायला मिळाला, रक्ता-नात्याच्या माणसांप्रमाणेच जिवाला जीव देणारे शिवसैनिक भेटले. वेळोवेळी त्यांच्या सुखःदुःखात सहभागी होता आलं. समाजासाठी काही करण्याचं स्वप्न तर उराशी होतच. सलग दोन वेळा जनतेने दाखविलेल्या विश्वासामुळे जनतेची सेवा करण्याचं भाग्य मिळाल. बाळासाहेबांचा आदेश शिरसावंदन मानून आयुष्यभर कार्य केलं. यापुढेही पक्षासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. शिवसेना हीच माझी खरी ताकद आहे. गमावण्याचं विचाराल तर गमवायला माझ्याकडे काही नव्हतचं. मध्यमवर्गातून आलेला मी शिवसेनेच्या संघटनेत बांधत गेलो आणि शिवसेनेच्या घरचा एक हिस्सा झालो. मी जो आज काही आहे तो शिवसेना या चार शब्दांमुळेच आहे आणि शिवसैनिकांच्या ताकदीवरच आहे. यांचे ऋण फेडण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करीन एवढं मात्र नक्की.
* आमदारकीचा झालेला पराभव जिव्हारी लागला का?
नाही. विभागातील जनतेचा आशिर्वाद माझ्यासोबत आहे आणि तो सदैव माझ्या पाठीशी असेल याची मला खात्री आहे. माझा पराभव करण्यासाठी आठ पक्षांना एकत्र यावं लागलं. त्यातून थोडय़ाफार मताधिक्क्याने माझा पराभव झाला. दिवसाचे 17 ते 18 तास जनतेमध्ये राहून जनतेसाठी काम करताना जनतेने मला पाहिलं आहे. सध्याच्या घडीला लोकांना आमदार या नात्याने मदत करता येत नाही. पण समाजकार्याचा घेतलेला वसा तेव्हाही तोच होता आणि भविष्यात कायम राहील. आठ पक्ष एकत्र येऊन देखील 3500 मतांनी माझा पराभव झाला. पण पडल्याचं दुःख न करत बसता त्याच संध्याकाळी मी माझ्या लालबागच्या कार्यालयात बसलो. शिवसैनिकांना धीर दिला. चांगल्या वाईट प्रसंगी शिवसैनिक पाठीशी उभा राहतो ही ताकद शिवसेनेची आहे. सध्या जे आमदार निवडून आले आहेत त्यांची काम पहायला मिळाली तर सुदैवच म्हणावं लागेल, थोडक्यात सांगायचं तर जनतेला आपल्या मताचा मोबदला आता मोजावा लागत आहे. येणार्या निवडणुकीत जनता सत्ता पालट करून दाखवेलच.
* पुन्हा आमदारकीची निवडणूक लढविणार का?
शिवसेना पक्षात काम करताना कोण निवडणूक लढविणार याचे अधिकार पक्षप्रमुख उध्दव साहेब यांच्याकडे राखीव आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या प्रयत्नांमुळेच दोन वर्षे आमदारकीची निवडणूक लढविता आली. फळाची अपेक्षा न करता काम करत राहणे हे प्रत्येक शिवसैनिकाला माहीत आहे. पण पक्षप्रमुखांनी आमदारकीच्या निवडणुकीसाठी माझ्यावर विश्वास दाखवला तर तो मी नक्कीच सार्थकी लाविन. आता लागोपाठ येणार्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचा भगवा शिवडी-परळ विधानसभेत पुन्हा एकदा मानाने डौलेल.
* आपल्या मतदार संघात तुमचा जनसंपर्क आजही तगडा आहे, याबद्दल काय सांगाल?
शिवसेना संघटनेसोबत शाखा ही संकल्पना शिवसेनाप्रमुखांनी सुरु केली. प्रत्येक विभाग तिथे शाखा असल्याने गेली 40 वर्षाहून अधिक काळ शाखेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सुटत असतात. आमदारानंतर नगरसेवक, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, शिवसैनिक कार्यकर्ते ही साखळी प्रत्येक घरात पोहोचली आहे. या साखळीमुळेच बर्याच घरातील समस्यांच निराकरण मला करता आलं. 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण हे सूत्र प्रत्येक शिवसैनिकाला अवगत झालं आहे. त्यामुळे पक्षाचा शेवटचा कार्यकर्ता हीच खरी संघटनेची ताकद आहे. त्यांच्यामुळेच तळागाळातील समस्यांचे प्रश्न मार्गी लागू शकेल.
* मराठी मतांच विभाजन होत आहे. हा मराठी माणसाचा पराभव म्हणायचा का?
शिवसेनेचे मुद्दे उचलून मराठी माणसाला नवनिर्माणाची स्वप्न सध्या इतर पक्षांकडुन दाखविली जात आहेत. पण जातीवंत व निष्ठावंत शिवसैनिक अशा भूलथापांना कधी भूलणार नाही. काँग्रेस पक्षाला अप्रत्यक्षपणे मदत करण्याच हे कारस्थान आहे. पण कोणत्या डुप्लिकेट सेना कितीही आल्या तरीही शिवसेनेशिवाय बदल घडविण्याची ताकद कोणत्या अन्य पक्षात नाही, हे मराठी माणसाला चांगलच समजल आहे. त्यामुळे गेल्या निवडणुकीत झालेल्या चुकांपासून मतदारांनी चांगलीच शिकवण घेतली आहे. शिवसेनेच्या छत्राखाली मराठी माणसांना अभय आहे. हे मराठी माणूस जाणतो आहे. त्यामुळे येणार्या निवडणुकांमध्ये मराठी माणसाची ताकद शिवसेनेच्या माध्यमातून मराठी माणूस दाखवून देईलच.
* दक्षिण- मध्य मुंबईतून अरविंद सावंत यांना उमेदवारी जाहीर झाली आहे, त्याबद्दल सांगा?
अरविंद सावंत हे 12 वर्षे विधानसभेत आमदार म्हणून निवडून गेले आहते. दक्षिण मध्य मुंबईत ते सर्वांना चांगले परिचयाचे आहेत. त्यांचा खूप चांगला कार्यकाळ शिवसैनिकांनी पाहिला आहे. त्यामुळेच उद्धव साहेबांनी खासदारकीच्या निवडणुकीची जबाबदारी अरविंद सावंत यांना दिली आहे. त्यामुळे अरविंद सावंत यांच्या विजयासाठी माझ्यासह सर्व शिवसैनिक झटून कामाला लागलो आहोत. पक्षश्रेष्ठींनी दाखविलेला विश्वास आम्ही सार्थकी लावू. आमच्या पातळीवर शाखाप्रमुख, गटप्रमुख यांचे मेळावे चालू आहेत. पक्ष बांधणीचं काम जोरदार सुरु आहे.
* तरुणांनी राजकारणात यावं का?
सध्याची तरुण पिढी मोठय़ा संख्येने राजकारणात येत आहे. शिक्षणासोबत राजकारण हा खूप चांगला पर्याय तरुणांपुढे आहे. राजकारणात सध्या तरुण तडफदार नेत्यांची गरज आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्र पिंजून काढला आहे. तरुणांसाठी एक सक्षम नेतृत्त्व आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून पूढे आलं आहे. राजकारणात जाऊन मुलं वाया जातात असा आपल्या घरच्यांचा समज झालेला असतो. पण आपण ज्या समाजात वाढलो, लहानाचे मोठे झालो त्या समाजाचे ऋण फेडण्यासाठी राजकारण एक पर्याय आहे.
लोकप्रिय नेत्याच्या कामगिरीवर धावती नजर
- जनतेचे राहणीमान, शालेय शिक्षण, रुग्णालय, मालमत्ता कर, पोलिसांच्या समस्या अशा अनेक प्रश्नांना विधानसभेत वाचा फोडली.
- विकसित झालेल्या चाळींच्या नवीन इमारतीवरील मालमत्ता कर 100 टक्क्यांवरून 20 टक्क्यांवर आणण्याचा यशस्वी प्रयत्न
- आमदार निधीच्या माध्यमातून मतसारसंघामध्ये शेकडो उपक्रम प्राप्त इमारतींची दुरुस्ती
- गलिच्छ वस्त्यांमध्ये अनेक नवीन शौचालये बांधली तर काही शौचालयाचे नूतनीकरण केले. लादीकरण व सुशोभिकरण केले.
- पाण्याच्या नवीन जलवाहिन्यांची जोडणी केली. डोंगर भागात जेथे दरडी कोसळण्याचा संभव होता तेथे संरक्षण भिंती नव्याने बांधल्या.
- अनेक क्रीडा व सेवा मंडळांना अभ्यासिका, वाचनालये व व्यायामशाळा बांधून दिल्या. काही व्यायामशाळेचे नूतनीकरण करत आधुनिक साहित्यही दिले.
- सामाजिक व माणुसकीच्या दृष्टिकोनातून नेहमीच केईएम, वाडीया, टाटा यासारख्या रुग्णालयातील रुग्णांना रुग्णालयातून चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी यशस्वी प्रयत्न केले.
- प्रतिवर्षी विद्यार्थ्यांना शाळा-महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
- मोफत वह्या वाटप, गुण गौरव करून विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले.
- असंख्य सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला-क्रीडा विषयक कामे हिरीरीने केली.
माजी कार्यसम्राट आमदार दगडू (दादा) सकपाळ हे वयाच्या 65 व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. त्यांना वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा! दादा, तुम्ही शतायुषी व्हा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. - दत्ता पोंगडे, शाखाप्रमुख———————————————————————————————————परळ विधानसभेत दगडू (दादा) सकपाळ यांचं योगदान खूप मोठ आहे. शिक्षणापासून, हॉस्पिटल तसेच वैयक्तिक अडचणींमध्ये ते सर्वांना सढळ हस्ते मदत करीत असतात. दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा! -कुमार शिंदे, शिवसैनिक———————————————————————————————————–लोकप्रिय नेते व माजी आमदार दगडू (दादा) सकपाळ यांच्याकडून प्रत्येक शिवसैनिकांशी असलेले घरचे संबंध, पक्षबांधणी असे गुण शिकायला मिळत असतात. त्यांना वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा! -वैभवी चव्हाण, नगरसेविका——————————————————————————————————दादांचा पराभव म्हणजे समाजकार्याला बसलेली खिळ आहे. दादांनी एवढे वर्षे केलेला समाजकार्याचा वसा मला जवळून पाहता आला.दादांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा! - सुधीर साळवी, समाजसेवक
- प्रविण दाभोळकर