”मैं शाहरुख रमजान शेख.. मेरे चाचा मुझे यू.पी.से बंबई के स्टेशन छोडकर चले गये.. स्टेशनपे रेहकर मे ड्रग्ज ऍडिक्ट हो गया था। एक दिन दीदी मुझको स्टेशन पे मिली। उसने मुझे समझाया। मुझे सेंटर लेके गई.. गाने, ड्रॉईंग, पढाई सिखाई। आज मैं पढना चाहता हँ। जिंदगी में आगे बढना चाहता हँ।
”समतोल सामाजिक संस्थेच्या मिलन समारोहात चिमुरडा शाहरुख आपल मनोगत व्यक्त करत होता. मंचावर बसलेल्या, शाहरुखसारख्या प्रत्येक मुलाला तेव्हा व्यक्त व्हायचं होतं. समतोल संस्थेला आम्ही सापडलो नसतो, तर आज रेल्वे स्टेशनजवळ कुठेतरी भीक मागताना, वाईट व्यसन करताना दिसलो असतो, असं त्यातल्या बहुतेकांना दुनियेला सांगायचं होतं. आकाशातले तारे जणू जमिनीवर अवतरले होते आणि आपल्या केविलवाण्या डोळयांनी बोलू पाहत होते.
रेल्वे स्टेशनवर भटकणाऱ्या शाहरुखसारख्या अनेक मुलांसाठी 45 दिवस समतोलच्या मनपरिवर्तन केंद्रात संस्कार शिबिर आयोजित केलं होतं. 20 जुलै 2014 हा त्याच्या समारोपाचा दिवस. आपल्या आईवडिलांपासून दूर आलेल्या या मुलांचा आणि त्यांच्या पालकांच्या मिलनाचाही तो दिवस होता. मालाडच्या खेतान हायस्कूलमध्ये हा हृद्य मिलन सोहळा पार पडला. या मिलन सोहळयामुळे संपूर्ण परिसराला उत्सवी स्वरूप आलं होतं, कारण अनेक वर्षं वनवास भोगणाऱ्या रामाप्रमाणे हे छोटे राम आपापल्या अयोध्येत पुन्हा जाणार होते. या एकाच दिवशी परमेश्वराने त्यांना दुसरं आयुष्य आणि आपल्या जन्मदात्यांना नव्याने भेटवलं होतं.
सी.एस.टी. स्थानकावर दिवसागणिक 150हून जास्त वाट चुकलेली मुलं येत असतात. कधी घरात मनाजोगं वातावरण नसतं, कधी मुंबई शहराबद्दल मनात औत्सुक्य असतं तर कधी काहीतरी वेगळं करून दाखवण्याची ऊर्मी, अशी अनेक कारणं या मुलांना मुंबईपर्यंत आणून सोडतात. मिळेल तिथे राहायचं, मिळेल ते खायचं अशी मानसिकता या मुलांनी आधीच तयार केलेली असते. स्वतःकडे असलेल्या पैशातून सुरुवातीचे दिवस चांगले जातात; पण हळूहळू मित्रांची संगत, व्यसनाधीनता, पैशांची चणचण या मुलांना क्रूर बनवते. या मनःस्थितीत या मुलांना आधार देणं, त्यांना समजावणं आणि पुन्हा त्यांना आपल्या आईवडिलांच्या छत्रछायेत पाठवणं खूप जिकिरीचं काम असतं. आपलं घरदार सांभाळत, संपूर्ण आयुष्य अशा मुलांसाठी अर्पण करणं हे अनोखं कार्य विजय जाधव यांच्यासारखे समाजसेवक आत्मीयतेने करत आहेत.
समतोलची सुरुवात
विजय जाधव यांनी 2006 साली सुरू केलेल्या समतोलच्या या संसाराला स्थिरस्थावर होण्यासाठी साधारण आठ वर्षं लागली. हा प्रवास खूप खडतर होता. वेळप्रसंगी चांगली-वाईट माणसंही भेटत होती. समाजातील प्रत्येक घटकांनी वेळोवेळी केलेल्या सहकार्यामुळेच आजपर्यंत 2000 मुलांना त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवता आलं, हेच संस्थेचं यश असल्याचं समतोलचे अध्यक्ष विजय जाधव सांगतात. कल्याणपासून जवळ असणाऱ्या मामणोली इथं, हिंदू सेवा समितीच्या आवारात वर्षातून तीन वेळा समतोल संस्थेचं मनपरिवर्तन शिबिर आयोजित केलं जातं. मार्च-एप्रिल, जुलै-ऑगस्ट, ऑक्टोबर-नोव्हेंबर या 45 दिवसांत साधारण 25 मुलांना घेऊन हे शिबिर सुरू होतं.या वेळी ‘स्वामी विवेकानंद मनपरिवर्तन केंद्र’ या समतोलच्या स्वत:च्या वास्तूचं उद्घाटन करण्यात आलं. वर्षातून तीन वेळा होणारी यापुढची मनपरिवर्तन शिबिरं या वास्तूमध्ये होणार आहेत. अनेक मुलांचे आईवडील बरीच शोधाशोध करूनही सापडत नाहीत किंवा काहींना घरी परतण्याऐवजी या संस्थेसाठीच काम करण्याची इच्छा असते, अशा सगळयांना नव्या वास्तूचा आसरा मिळणार आहे.
स्वयंरोजगारातून स्वावलंबनाकडे नेण्याचे उद्दिष्ट
स्वयंरोजगाराच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक मुलाला स्वावलंबी बनवण्याचा संस्थेचा हेतू आहे. या वास्तूत प्लंबर, इलेक्ट्रिशियन, टर्नर-फिटर, संगणक, शेती व्यवसाय असे प्रशिक्षण या मुलांना देण्याचा मानस विजय जाधव यांनी व्यक्त केला. एम.एस.डब्ल्यू.चे प्रशिक्षण घेणारे विद्यार्थीही आपले घरदार सोडून मनपरिवर्तन केंद्रात अहोरात्र मेहनत घेत असतात. अलीकडे झालेल्या शिबिरात जळगावहून आलेले एम.एस.डब्ल्यू.चे विद्यार्थी शिबिरार्थींवर देखरेख ठेवून होते. आपल्या प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून समतोल संस्थेत आलेले हे विद्यार्थी मुलांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यात मानसिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी मेहनत घेतात. मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांच्यासारखे दिग्गजही मुद्दाम वेळ काढून मनपरिवर्तन केंद्रात पोहोचतात आणि या मुलांना प्राणी-पक्षी जगताविषयी ममत्व निर्माण होण्यासाठी खास सत्र घेतात. माय मराठी ऍक्टिव्हिटी सेंटरच्या माध्यमातून ठाण्यात गतिमंद मुलांसाठी काम करणारे विकास घोगरे हेदेखील समतोलच्या मुलांसाठी नृत्याचे प्रशिक्षण घेतात, वेगवेगळया सत्रांतून मुलांमधली शिकण्याची वृत्ती जागृत ठेवत असतात. समाजातील अशा मंडळींमुळे या लहानग्यांवर चांगले संस्कार व्हायला मदत होते.
सत्रं घेण्यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रातील मातब्बर मंडळी आनंदाने येतात, याचं श्रेय विजय जाधव यांच्या जनसंपर्काला. मात्र हे शिबिर यशस्वी होण्यासाठी अन्य गोष्टींचीही जुळवाजुळव करावी लागते, प्रामुख्याने आर्थिक जुळवाजुळव. शिबिरातल्या मुलांसाठी साधंच पण पोटभर जेवण, त्यांच्यासाठी कपडे मिळवणं अशी त्यांची धावपळ चालू असते. अनेक संस्था मदतीचा हात पुढे करतातही. पण समतोलची ही सेवा निरंतर चालणारी आहे, त्यात खंड नाही. त्यामुळे पैशाची गरज नेहमीचीच असते.वाट चुकलेल्या या मुलांवर संस्कार करताना त्यांच्यावर निसर्गरक्षणाचा संस्कारही व्हावा, या हेतूने या शिबिरात वृक्षारोपणाचा कार्यक्रमही पार पडला. शनिवार, 12 जुलै या गुरुपौर्णिमेच्या शुभदिनी मुलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. हिंदू सेवा समितीच्या मामणोली येथील आवारात हे वृक्षारोपण करण्यात आलं. आपल्या सभोवतालचा निसर्ग, त्यात राहणारे पशुपक्षी यांची काळजी घेणं, त्यांना इजा न पोहोचवणं ही आपली जबाबदारी आहे, याची शिकवण त्यांच्या मनात रुजवण्याचा हा प्रयत्न असतो.मनःस्थिती समजून घेतानारेल्वे स्टेशनवर भटकणाऱ्या मुलांशी बोलणं, त्यांची मनःस्थिती समजून घेऊन त्यांचा विश्वास संपादन करणं हे खूप कठीण काम असतं. घर सुटल्यामुळे सैरभैर झालेली, वाईट संगतीने व्यसनांच्या विळख्यात अडकलेली, कुमार्गाला लागलेली, आपल्याला हवी ती वस्तू नाही मिळाली तर समोरच्या माणसाच्या जिवाचं बरंवाईट करायलाही मागेपुढे न बघणारी ती साधारण 7 ते 14 वयोगटातली मुलं असतात. त्यांना मनपरिवर्तन केंद्रात दाखल करण्यापूर्वी पोलिसात त्यांची रीतसर नोंद केली जाते. दिवसभर भटकणं, कचरा वेचणं, व्यसन करणं, भीक मागणं, चोरी-लबाडी करणं अशा बेश्ािस्त दैनंदिन जीवनातून त्यांच्या आयुष्याला शिस्त लागण्यासाठी थोडा वेळ द्यावाच लागतो; हळूहळू ही मुलं या वातावरणात रमून जातात.
शिबिरातील दैनंदिनी
सकाळी लवकर उठणं, व्यायाम, प्रार्थना करणं, अनौपचारिक शिक्षण, मैदानी खेळ, सांस्कृतिक खेळ, ध्यानधारणा अशा सत्रांमधून मुलांच्या जगण्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करावा लागतो. माणसांचे चेहरे वाचण्याची कला, माणसांना ओळखण्याची कला तर त्यांना रस्त्यावरच्या जगण्यातून अवगत होते. त्यामुळे ही मुलं समोरच्याला पटकन ओळखतात. एकदा त्याच्या चांगुलपणाबद्दल खात्री पटली की जवळ येतात. एकदा शिकवलेल्या गोष्टींमधले बारकावेही बऱ्याचदा त्यांच्या चांगले लक्षात राहतात. पाहुणे म्हणून आपण गेलो की ”स्वागत है भाई स्वागत है। मेहमानों का स्वागत है..” असं एकसुरात म्हणून पाहुण्यांना भारावून टाकतात. ”नमस्कार भाईयों, नमस्कार दोस्तों, मेरा नाम महेश है, मैं गुजरात से आया हँ..” असं म्हणत प्रत्येक जण स्वतःची ओळख करून देतो. गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश अशा देशातल्या वेगवेगळया राज्यांतून आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळया भागातून आल्याचं त्यांच्या ओळखीतून कळतं. एवढया लहान वयात या लहानग्यांचा एवढया दूरवरचा प्रवास डोळयासमोर उभा राहतो. हाच मुलगा जर मला रेल्वे स्टेशनजवळ भेटला असता, तर एवढयाच नम्रपणे बोलला असता का? असं काहीसं मनाला स्पर्शून जातं. पण आपणही या मुलांमध्ये हळूहळू गुंतायला लागतो. बरीचशी मुलं नवीन काहीतरी ऐकण्यास उत्सुक असतात, पण काही जण मात्र अनेक दिवस एकत्र राहिल्यानंतरही एकटं राहणंच पसंत करतात.
ही मुलं आजूबाजूला चाललेल्या गोष्टींमध्ये रमू शकत नाहीत, कधीतरी पळून जाण्याचा प्रयत्न करतात. यातल्या काही जणांनी शाळा कधीच पाहिलेली नसते, पण इथे शिकवलेल्या प्रार्थना सर्वांच्या अगदी तोंडपाठ असतात. ”इतनी शक्ती हमें देना दाता। मन का विश्वास कमजोर हो ना…” एकमेकांच्या आधी गाणं म्हणण्याची त्यांच्या गंमतशीर धडपडीमुळे गाणं लवकर संपतं. जेव्हा गाण्याचा अर्थ समजायचं वय होईल, तेव्हा ही आठवण त्यांच्याकडे राहिलेली असेल, असं काहीसं वाटू लागतं. त्यानंतर मग ”हम होंगे कामयाब.. हम होंगे कामयाब एक दिन।” हे प्रेरक गीत सुरू होतं. आयुष्यात वाट चुकलेल्या मुलांना अशा गाण्यांच्या माध्यमातून जगण्याची ओढ निर्माण केली जाते. तुम्ही दिवसभर या मुलांमध्ये राहिलात तर काहीच तासात या मुलांची आपल्याशी दोस्ती होते. मग त्यांच्याजवळ बसलं की आपण याआधी काय करायचो, कसं भेटलो, काय काय शिकायला मिळालं, त्यांच्या घरची परिस्थिती यावर पोपटासारखे चुरूचुरू बोलू लागतात. मोठं झाल्यावर समतोलसारख्या समाजसेवी संस्थेत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात.समतोलचं योगदानयातली काही मुलं आता आपल्या पालकांकडे जातील, काही सुधारगृहात जातील, काही खूप चांगले शिकतील, मोठे अधिकारी होतील; पण समतोलचा उंबरठा ओलांडून जर आत आले नसते, तर यांचं काय झालं असतं? याची कल्पनाच न केलेली बरी. मिलन सोहळयाच्या वेळी आपले पालक भेटल्याचा आनंद होता, तेवढंच आपल्या नव्या मित्रांना सोडून जाण्याचं दुःखही त्यांच्या डोळयातून लपत नव्हतं. समतोलच्या जडणघडणीत अगदी रेल्वे स्टेशनवर फील्डवर्क करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून ते संस्थेला वेळोवेळी मदत करणारे हितचिंतक, देणगीदार यांचाही मोठा हातभार असतो. समाजातील असमतोल जेव्हा बिघडतो, तेव्हा समतोलसारख्या सामाजिक संस्था समाजात आपलं कार्य सातत्याने करत असतात. यामुळेच कोणालातरी नवं आयुष्य मिळत असतं, चांगल्या संस्कारांची देवाणघेवाण होत असते. प्रत्येक काळोख्या रात्रीनंतर दिवस येतोच, म्हणून समतोलचं ब्रीदवाक्यही त्यांच्या कामाला साजेसं असंच आहे – ‘उगता सूरज राह दिखाए, भाग रहा है अंधेरा.. आंधियोसे, तुफानोसे कब रुकेगा सबेरा..।’
आणखी एका शिबिराच्या यशस्वी सांगतेनंतर समतोलचे कार्यकर्ते आता पुन्हा तयार झाले आहेत रेल्वे स्टेशनावर भरकटलेल्या मुलांना नवं आयुष्य द्यायला!




