Saturday, 22 February 2014

प्रथमेश परबच्या हस्ते ‘स्टडी लव्ह सेक्स धोका’ चे प्रकाशन

 

 टाइमपास आणि बालक पालक या दमदार चित्रपटांमुळे प्रथमेश परब हा तरुणांच्या गळ्यातला ताईत बनला आहे. त्याच्या या चित्रपटातील भुमिकांमुळे कॉलेज कट्ट्यावरची मुल ही  ‘स्टडी लव्ह सेक्स धोका या विषयावर खुलेपणाने बोलायला आणि सकारात्मक विचार करायला लागली आहेत. याच विषयावर आधारीत पुस्तकाचे प्रकाशन विशु आणि दगडु अशी ओळख असणाऱ्या प्रथमेश परबच्या हस्ते करण्यात आले.   स्टडी लव्ह सेक्स धोका ही कादंबरी आजच्या पिढीचं जगणं नेमकेपणाने जसं आहे तसं मांडते. पौगंडवयीन मुला-मुलींच्या भावविश्वाचं वर्णन करताना याच पिढीच्या भाषेत ही कादंबरी बोलते. कादंबरीतील ही बोल्ड पण तितकीच सोपी भाषा वाचकाच्या ह्रदयाला भिडणारी आहे, असं मत बालक-पालक आणि टाइमपास सिनेमांमुळे लोकप्रियतेच्या शिखरावर असलेलेला युवा अभिनेता प्रथमेश परब याने व्यक्त केलं. सुरेन करंबे यांनी लिहिलेल्या स्टडी लव्ह सेक्स धोका या कादंबरीचं प्रकाशन प्रथमेश परब याच्या हस्ते झाले. त्यावेळी तो बोलत होता. याप्रसंगी बालकपालकचे लेखक अंबर हडप, लेखक सुरेन करंबे, नवता बुक वर्ल्डचे प्रकाशक कीर्तिकुमार शिंदे आणि प्रवीण धोपट उपस्थित होते. दादर पश्चिम येथील धुरु सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात अभिनेता प्रथमेश याने तरुणांच्या दृष्टिकोनातून अभ्यास, प्रेम, सेक्सविषयी आपली मतं मोकळेपणाने मांडली. मला विशु आणि दगडुच्या भुमिकेतच पहायला चाहत्यांना आव़डलय पण या भुमिकेतुन बाहेर येत मला पुस्तकाविषयी बोलायचय असे म्हणत प्रथमेशने चाहत्यांची सुरुवातीस परवानगी  घेतली. प्रेमासोबत जबाबदारीची जाणीव निर्माण व्हायला हवी, आणि प्रेमात असतानाही आपल्या ध्येयाचा विसर पडू देऊ नयेतारुण्यात पदार्पण केल्यानंतर मुलींशी संवाद साधला जातो, त्याप्रमाणे मुलांशीही संवाद साधायला हवा. स्टडी लव्ह सेक्स धोका या कादंबरीत असा संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, असंही मत प्रथमेशने व्यक्त केलं. बालकपालक चित्रपटात सेक्स, धोका तर टाईमपास चित्रपटात स्टडी, लव्ह याविषयी सांगण्यात आले आहे. हे पुस्तक म्हणजे या दोन चित्रपटातला ब्रिज असल्याचेही तो म्हणाला.बालकपालक सिनेमाचे लेखक अंबर हडप कादंबरीविषयी आपलं मत व्यक्त करताना म्हणालेस्टडी लव्ह सेक्स धोका हे नाव थोडंसं नकारात्मक वाटत असलं तरी अत्यंत सकारात्मक विचार मांडणारी ही कादंबरी आहे. विशेष म्हणजे लेखकाने पौगंडवयीन मुलामुलींच्या जीवनातील घटनांचं वर्णन करताना अनेक पैलूंनी आणि दृष्टिकोनांतून प्रसंगांची मांडणी केली आहे. कादंबरीतील भाषाशैली अत्यंत प्रवाही आणि साधीसोपी असल्यामुळे तिचा वाचकाच्या मनावर प्रभाव पडतो.
कादंबरीतील कथासूत्र आणि आशय यांविषयी भाष्य करताना प्रवीण धोपट म्हणालेस्टडी लव्ह सेक्स धोका ही कादंबरी आजच्या काळातील आहे. आजच्या काळातील तरुणांची भाषा तसंच त्यांच्या प्रत्यक्ष जगण्यातल्या अनेक संदर्भांना-अगदी इंटरनेट, फेसबुकसह- ती कवेत घेते. प्रत्येकाच्या जीवनात अपरिहार्यपणे येणा-या टप्प्यांचं मार्मिक वर्णन कादंबरीत करण्यात आलं आहे. कादंबरीतील प्रसंग हे आपल्या घरात घडणारे आहेत, म्हणूनच ती वाचताना स्वत:शी संवाद साधल्याची अनुभूती येते.
आजची तरुण पिढी प्रचंड स्पर्धेमुळे अत्यंत तणावाखाली जगत आहे. हा तणाव कमी करण्यासाठी या पिढीशी पालकांनी संवाद साधणं अत्यंत महत्वाचं आहे. ही कादंबरी लिहिताना मी अनेक पौगंडवयीन मुलामुलींशी बोललो. त्यांच्याशी संवाद साधल्यामुळेच त्यांचं जगणं मी कादंबरीत मांडू शकलो, असं मत लेखक सुरेन करंबे यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना मांडलं. नवता बुक वर्ल्डचे प्रकाशक कीर्तिकुमार शिंदे यांनी प्रकाशन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.फोटोओळ- पौगंडवयीन मुला-मुलींच्या भावविश्वाचं वर्णन करणा-या स्टडी लव्ह सेक्स धोका या कादंबरीचे प्रकाशन करताना (डावीकडून) लेखक सुरेन करंबे, सिनेकथाकार अंबर हडप, अभिनेता प्रथमेश परब, नवता बुक वर्ल्डचे प्रकाशक कीर्तिकुमार शिंदे आणि प्रवीण धोपट. -प्रविण दाभोळकर

https://mail.google.com/mail/u/0/images/cleardot.gif


Friday, 14 February 2014

एमडीचा स्फूर्ती












महर्षी दयानंद महाविद्यालयाच्या एन. एस. एस. युनिटचा स्फूर्ती हा आंतर-महाविद्यालयीन कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला. अनेक महाविद्यालयांच्या एन. एस. एस. स्वयंसेवकांनी स्फूर्तीमध्ये हिरीरीने भाग घेतला. स्फूर्ती कार्यक्रमांतर्गत झालेल्या स्पर्धांमध्ये रस्ता सुरक्षा, महिला सबलीकरण, एच.आय.व्ही./एड्स व्यसनमुक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता असे विविध सामाजिक विषय हाताळण्यात आले. या सामाजिक विषयांवर आधारीत स्पर्धांमध्ये मुंबई विद्यापीठाच्या एकूण ३२ महाविद्यालयांनी आपला सहभाग दाखविला. 

     पथनाट्य, पोस्टर, वादविवाद, काव्यवाचन आणि कॉलेजमार्फत राबवण्यात येणारा उत्कृष्ट प्रकल्प या माध्यमातून सामाजिक विषय हाताळण्यात आले. पथनाट्य स्पर्धेत रुईया महाविद्यालय, तर वादविवाद स्पर्धेत डॉ. टी. के. टोपे महाविद्यालयाने प्रथम पारितोषिक पटकावले. पोस्टर मेकींग स्पर्धेत रुपारेल महाविद्यालय व काव्यवाचन स्पर्धेत सिद्धार्थ महाविद्यालयाने बाजी मारली. उत्कृष्ट सामाजिक उपक्रम सादरीकरणातही सिद्धार्थ महाविद्यालयच अव्वल ठरले. एम.डी महाविद्यालयाच्या नावाजलेल्या कबड्डीपटू गौरी वाडेकर आणि सुवर्णा बारटक्के यांना शिवछत्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना सत्कारमूर्ती म्हणून महाविद्यालयातर्फे गौरविण्यात आले.

        महाराष्ट्र राज्य महामार्ग पोलीस डॉ. रश्मी करंदीकर यांनी स्वयंसेवकांना रस्ता सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन केले तसेच ‘स्वरक्षा’ या अनोख्या मोबाईल ऍपची माहिती दिली. ज्याचा वापर अपघात स्थळी, व महत्त्वाच्या वेळी, मदतीसाठी केला जाऊ शकतो. सर्व विद्यार्थ्यांनी हे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून ‘स्वरक्षा’ला पाठिंबा दर्शविला.स्वीडनवरून आलेल्या ग्लोबल कॉलेजच्या प्राध्यापकांनीही स्फूर्ती इव्हेंटला भेट दिली. एम.डी महाविद्यालयाच्या एन.एस.एस.युनिटने वर्षभरात वॉल ऑफ फेम, रस्तासुरक्षा या विषयावर राबवलेल्या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले. 


-प्रवीण दाभोळकर

रुपारेलमध्ये ‘व्यसनमुक्ती’


रुपारेल महाविद्यालयातर्फे व्यसनमुक्तीवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सुपरस्टार सिद्धार्थ जाधव याच्या उपस्थितीने या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाला चार चॉंद लागले. यात मानसोपचार तज्ञ डॉ. वंदना कुलकर्णी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. एन. एस. एस युनिटच्या व्यसनमुक्तीच्या पथनाट्याने व एन.सी.सी विद्यार्थ्यांच्या शिस्तबद्ध परेडने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

      ‘‘प्रेमाची नशा साथ देई आणि व्यसनांची नशा घात करी’’ हे घोषवाक्याचे तंतोतंत पालन करत नशाबंदीच्या उपक्रमाला पाठिंबा देण्याची शपथ सिद्धार्थच्या साक्षीने सर्व विद्यार्थ्यांनी घेतली ज्यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांनीही पुढाकार घेतला. 

     व्यसनामुळे बळी जाणार्‍या तरुणांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे म्हणून रुपारेल महाविद्यालयाने हा आगळावेगळा कार्यक्रम घडवून आणला. व्यसनांपासून दूर राहत आपल्या आरोग्यावर प्रेम करण्याची शपथ या विद्यार्थ्यांना देण्यात आली.

  

ढसाळांच्या प्रत्येक साहीत्यावर वेगळी एकांकीका होऊ शकते- अजित भगत

    नामदेव ढसाळांच्या साहीत्यात एवढी ताकद आहे की, प्रत्येक कथा, कादंबरी काव्यातुन वेगळी एकांकीका होउ शकते, असे गौरवोद्गार नामदेव ढसाळ स्मृतीप्रीत्यर्थ एकांकीका स्पर्धेच्या बक्षिस वितरण सोहळ्यात जेष्ठ परिक्षक अजित भगत यांनी काढले. नामदेव ढसाळ स्मृतीप्रीत्यर्थ एकांकीका स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा नुकताच स्वा.सावरकर सभागृहात पार पडला. व्योम प्रतिष्ठानतर्फे आयोजित एकांकीका स्पर्धेत महाराष्ट्रभरातुन अनेक एकांकीका सादर झाल्या. झेप कलामंच, मुंबईच्या E=MC2 या एकांकीकेने बाजी मारली. नाट्यमय ठाणेच्या ओश्तोरीज एकांकीकेला दुसरे तर डॉ. बी.ए.एम विद्यापिठ, औरंगाबाद यांना तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक पटकवता आले. रंगसंगती कलामंचच्या नही तो गोली मार दुंगा या एकांकीकेला प्रेक्षक पसंतीची एकांकीका म्हणुन गौरविण्यात आले. 15 फेब्रुवारी हा पद्मश्री नामदेव ढसाळांचा जन्मदिवस. त्याच्या जन्मदिवसाचे औचित्य साधुन पुर्वसंध्येला हा अविस्मरणीय सोहळा मान्यवर तसेच तरुणाईच्या साक्षीने पार पडला.

      व्योम प्रतिष्ठानच्या पदार्पणाच्या वर्षात घेण्यात आलेल्या या राज्यस्तरीय एकांकीका स्पर्धेत महाराष्ट्रभरातुन 29 संस्था सहभागी झाल्या होत्या. ज्यामध्ये झेप कलामंच  मुंबईची E=MC2, स्टेज ड्रीमर प्रोडक्शन, पुणेची बास्टर्ट, अश्वमेध थिएटर्स, नाशिक येथील पाणीपुरी, रंगसंगती कलामंच मुंबईची नही तो गोली मार दुंगा, डॉ. बी.ए.एम विद्यापिठ, औरंगाबादची गांडु बगीचा, नाट्यमय ठाणेच्या ओश्तोरीच या पाच एकांकीकेत अंतिम फेरीची चुरस पहायला मिळाली.
      सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक ओश्तोरिचसाठी अमोल भोर तर सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक E=MC2 साठी विनायक चव्हाण याला मिळाले. सर्वोत्कृष्ट अभिनेता व अभिनेत्री हे अनुक्रमे पाणीपुरीसाठी प्राजक्त तर बास्टर्टसाठी गंधाली घाटे यांनी पटकावले. प्रकाश योजना-भुषण देसाई (ओश्तोरीच), नेपथ्य- सचिन गावकर(ओश्तोरीच), पार्श्व संगीत-राहुल जोगळेकर (बास्टर्ट), संगीत संयोजन- सुमेध चव्हाण (नही तो गोली.....)तसेच रंगमंच व्यवस्था- नाट्यमय जोशी (ओश्तोरीच) यांना देण्यात आले.
   अजित भगत, हेमंत लबदे, नारायण राजम तसेच तुलसी बेहरे, शर्वरी पिल्ले यांनी या स्पर्धेचे परिक्षण केले. एवढ्या चांगल्या उपक्रमाला जाहीरातदार मिळणे ही शोकांतीका असल्याचे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सिनेट मेंबर ऑफ महाराष्ट्र डॉ. राजेंद्र तेंडुलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केली. महाराष्ट्रभरातुन स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचे व्योम प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार कदम यांना आभार मानले.


-प्रविण दाभोळकर

Wednesday, 12 February 2014

रुईया महाविद्यालयात सेल्फ व्हिजनतर्फे अंध विद्यार्थ्यांसाठी लुई ब्रेल डे चे आयोजन


माटुंग्याच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात सेल्फ व्हिजनतर्फे अनोखा स्तुत्य उपक्रम नुकताच राबविण्यात आला. महाविद्यालयातील अंध विद्यार्थ्यांसाठी लुई ब्रेल डे चे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते.  यामध्ये महाविदयलयातील अंध विद्यार्थ्यांनी मिळुन अनेक मनोरंजनाचे कार्यक्म सादर केले. नृत्य, गायन, नाट्य तसेच योग मल्लखांबाच्या कसरतींचा नजराणा पेश करत उपस्थित सर्वांचीच वाहवा मिळविली. नटरंग चित्रपटातील दमदार नांदी सादर करीत कार्यक्रमाचा श्री गणेशा केला. तसेच इतर चित्रपटांच्या गितांवर बहारदार नृत्य सादर करत योगासनांची प्रात्यक्षीकेही सादर करण्यात आली.

   कार्यक्रमाचे अजुन एक आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध पार्श्वगायिका संजीवनी भेलांडे आणि मराठी सुपरस्टार भरत जाधव यांनी कार्यक्रमात आपली उपस्थिती दाखविली. कार्यक्रमाचे उद्घाटन करत भरत जाधवने कलाकारांचे भरभरुन कौतुकही केले. कलेच्या सादरीकरणात रोप मल्लखांबाची जोड दिल्याने प्रेक्षकांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला. अंध विद्यार्थ्यांसाठी सेल्फ व्हिजन सेंटरने आयोजित केलेल्या आंतरमहाविद्यालयीन बुद्धीबळ स्पर्धेच्या विजेत्यांचा बक्ष्स समारंभही या निमित्ताने करण्यात आला.
    कलाकारांनी पु.ल देशपांडेच्या लेखनावर आधारीत नाटुकली सादर करीत प्रेक्षकांमध्ये एकच हशी पसरविला. डिस्को दिवाने या गाण्यावर नृत्य करीत व मराठी ब्लॉक बस्टर दुनियादारीचा टायटल ट्रॅक प्रस्तुत करीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व अंध विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविण्यात व त्यांना आत्मविश्वास देण्याची परंपरा रुईया महाविद्यालयाने याहीवर्षी टिकविली.
-प्रविण दाभोळकर