****प्रवीण दाभोळकर********
किल्ल्यांचा आदर करणारी एक नवी पिढी आपल्याला सध्या पाहायला मिळते, ज्यांना हा गौरवशाली इतिहास, गडकिल्ल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे. गडकिल्ल्यांचे जतन,संवर्धन करायचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही मंडळी पुरातत्त्व विभागाच्या मदतीने गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचे, डागडुजीचे काम करीत असतात. गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना स्वच्छतेचे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असतात. हेच गडकिल्ल्यांचे आधुनिक राखणदार आहेत.गडकिल्ले हे महाराष्ट्राची शान आहेत. हिंदवी स्वराज्याच्या काळात स्वसंरक्षणासाठी, रसद गोळा करण्यासाठी, शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी असलेले हे गडकिल्ले. ही शान अबाधित राहावी म्हणून छत्रपती शिवरायांसोबत असंख्य शूरवीर मावळयांनी आपले प्राण पणाला लावले. हे गडकिल्ले जिंकण्यासाठी बाजीप्रभू, तानाजी अशा सिंहासारख्या शूरवीरांना वीरगती प्राप्त झाली. तीन-चार शतकांपूर्वी बांधलेले गडकिल्ले अजूनही शाबूत आहेत, यावरून त्या वेळच्या भक्कम बांधकामाची व्यवस्था, तेव्हाच्या अभियंत्यांच्या कलेचा,कौशल्याचा अंदाज बांधता येईल. हे गडकिल्ले जिंकण्यासाठी, टिकविण्यासाठी मावळयांनी वेळप्रसंगी प्राणंाची आहुती दिली. त्यातूनच आपल्याला वैभवशाली इतिहासाचा वारसा मिळाला. मात्र आता, चारशे-साडेचारशे वर्षे ऊन-पाऊस-वारा यांचा मारा सहन केल्यामुळे यातील बहुतेक किल्ल्यांचे बुरूज ढासळू लागले आहेत. निव्वळ पर्यटक म्हणून जाणाऱ्यांना वर्षानुवर्षे या किल्ल्यांची दुरवस्था बहुधा कधी कळलीच नसावी. गडकिल्ल्यांवर गेल्यावर किल्ला स्वत:च्या मालकीचा असल्याचा आविर्भाव आणत, आपले व आपल्या जोडीदाराचे नाव लिहिणे, खाण्यापिण्याच्या वस्तू, प्लॅस्टिक बाटल्या गडकिल्ल्यांवर इतरत्र फेकणेअशा गोष्टी करतात.
कधीकाळी बांधलेले हे दुर्ग ढासळल्याने तेथे आता पाहण्यासारखे काही नसेल असेही काही जणांना वाटते. पण हे गडकिल्लेच मराठयांच्या इतिहासाचे गौरवशाली साक्षीदार आहेत. पुढील पिढयांना अभिमानाने सांगाव्या अशा अनेक घटना या किल्ल्यांवर घडल्या आहेत. किल्ल्याचा बालेकिल्ला, किल्ल्याची रचना, तिथले तट-बुरूज, बुलंद दरवाजे, चोरवाटा, माची, तिथली देवळे अशा अनेक गोष्टी किल्ल्यांवर जाऊन पाहण्यासारख्या असतात. या किल्ल्यांचा आदर करणारी एक नवी पिढी आपल्याला सध्या पाहायला मिळते, ज्यांना हा गौरवशाली इतिहास सांगणाऱ्या या गडकिल्ल्यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहोचवायची आहे. गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन करायचे आहे. कायद्याच्या चौकटीत राहून ही मंडळी पुरातत्त्व विभागाच्या मदतीने गडकिल्ल्यांच्या स्वच्छतेचे, पुनर्बांधणीचे काम करीत असतात. गडकिल्ल्यांच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावकऱ्यांना स्वच्छतेचे, शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असतात. हेच गडकिल्ल्यांचे खरे रखवालदार आहेत.
महाराष्ट्रात गडकिल्ल्यांचे संवर्धन करणाऱ्या अनेक स्वयंसेवी संस्था आहेत. आपल्या दैनंदिन कामातून वेळ काढत इतिहासाच्या प्रेमापोटी काही शिवप्रेमी, गडप्रेमी मंडळी गडकिल्ल्यांना भेटी देत असतात. तिथे जाऊन स्वच्छतेबद्दल जगजागृती, स्वत: पुढाकार घेऊन साफसफाई करीत असतात. गडकिल्ल्यांची डागडुजी, तिथे नियमित साफसफाई केली, व त्यांना पर्यटनस्थळांची मान्यता मिळाली, तर अनेक पर्यटक अशा ठिकाणी भेटी देऊ शकतात. बहुतेक गडप्रेमी गट अनेकदा बहुचर्चित गडांना भेटी देत असतात. इतरांना सोबत नेऊन त्या गडासंबधी माहिती देणे, साफसफाई, स्वच्छता करणे असे उपक्रम राबविले जात असतात. पण आजही अनेक गडकिल्ले दुर्लक्षित आहेत, ज्यांच्याबद्दल अनेक जणांना जास्त माहिती नाही.
गडकिल्ल्यांसाठी काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेचे एक वेगळे वैशिष्टय आहे. एकमेकांशी स्पर्धा न करता या सर्व संस्था एकत्र येऊन शिवकालीन इतिहास टिकविण्याच्या, तो इतिहास पुढच्या पिढीत रुजविण्याच्या मोहिमेला हातभार लावतात. 'गडवाट' या संस्थेने गडकिल्ले संवर्धनासाठी काम करणाऱ्या वेगवेगळया 22 संस्थांना एकत्र करून रायगडावर महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी प्रकाशव्यवस्था असावी अशी मागणी केली. पुरातत्त्व विभागाच्या सल्ल्याने स्वच्छता, डागडुजी केली. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा केला. महाराजांच्या समाधीच्या ठिकाणी दिवा लावून प्रत्येक सणांची सुरुवात करण्याचा गडवाटचा प्रयत्न असतो,असे सचिव विशाल पेडणेकर सांगतात. प्रत्येक गडकिल्ल्यांवर चौकी पहारा असावा, यासाठी 'गडवाट' नेहमी प्रयत्नशील असते. निव्वळ सहलीसाठी जाणारी असंख्य मंडळी किल्ल्यापर्यंत गाडया नेऊन दारूच्या पाटर्या करतात. यासाठी येथे स्थानिक रहिवाशांनी चौकी उभारावी यासाठी 'गडवाट'चे कार्यकर्ते प्रयत्नशील असतात. किल्ल्यांवर येणाऱ्या गाडयांची पाहणी करून मद्य नेण्यास बंदी केली, तरच गडकिल्ल्यांवर सहलीसाठी येणाऱ्या मंडळींवर जरब बसू शकते. आपल्याला कोणी बोलणारे नाही म्हणून गडकिल्ल्यांवर सररास पाटर्या केल्या जातात, याला वेळीच आळा बसला पाहिजे. संस्थेमार्फत
अनेक मंडळींना सोबत नेऊन त्या गडकिल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व सांगितले जाते. गडवाटच्या सुरुवातीच्या दिवसात ठरावीक पाच ते सात किल्ल्यांना भेटी द्यायचे ठरविले होते. त्याप्रमाणे कार्यक्रमाचा एक भाग व इतरांना सोबत घेता यावे म्हणून सोशल मीडियावर या कार्यक्रमाची माहिती टाकण्यात आली. याला सर्व ठिकाणांहून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. मुंबई, पुणे, नाशिक, सातारा अशा शहरांतून गडप्रेमी सहभागी झाले. स्थानिकांना सोबत घेऊन राजगड पाली दरवाजाच्या निखळलेल्या पायऱ्या मातीने भरून काढत गडसंवर्धनाची मोहीम गडवाटने यशस्वीपणे राबविली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यात राहणाऱ्या संतोष माने यांनी गडसंवर्धनासाठी 'गनिमी कावा' या ग्रूपची स्थापना केली आहे. वेगवेगळया ग्रूप्सशी संलग् राहणाऱ्या संतोष यांनी इतिहासाचा वारसा असणाऱ्या पन्हाळयाच्या पायथ्याशी राहणाऱ्या 13 मित्रांना घेऊन सात वर्षांपूर्वी 'गनिमी कावा' या संस्थेची सुरुवात केली. एखाद्या ठिकाणी जाऊन इतिहासाबद्दल जागृती करणे, लोकांमध्ये गडकिल्ल्यांबद्दल आत्मीयता निर्माण करणे अशी कामे गनिमी कावामार्फत केली जात असतात. जनतेला आपल्या इतिहासाची थोरवी आपण सांगू शकलो, त्याचे महत्त्व उलगडून दाखवू शकलो तर ते गडकिल्ल्यांकडे वळतील व त्यांचे संवर्धन करतील या जाणिवेतून गनिमी कावाचे काम सातत्याने चालत आहे. पन्हाळगड, पावनखिंड, विशालगड, दुर्लक्षित असलेला मुठागड या किल्ल्यांवर त्यांनी आतापर्यंत विशेष मोहीम राबविली आहे. आजही काही किल्ल्यांची शासनदरबारी नोंद नाही. त्यांची नोंद झाली तरच त्यासाठी निधी मिळू शकतो व किल्ल्याच्या विकासासाठीची कामे होऊ शकतात. पुरातत्त्व विभागाला कायद्याच्या चौकटीत राहून सर्व कामे करावी लागतात. पुरातत्त्व विभागासोबत राहून, खास लक्ष देऊन सुरळीत कामे होऊ शकतात असा काही गडप्रेमींचा अनुभव आहे. गडकिल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांना दुर्गसंवर्धनाबद्दल प्रबोधन व्हावे, या उद्देशाने 'दुर्गसखा' या संस्थेची स्थापना केली गेली. मकरंद केतकर, मनोज चव्हाण, अभिजित काळे, चेतन राजगुरू, सुबोध पाठक ही मंडळी दुर्गसखामार्फत प्रबोधनाचे काम यशस्वीरित्या करीत आहेत. संस्थेतर्फे दर वर्षी 'दुर्गअभ्यास भ्रमण' आयोजित केले जाते. त्या कार्यक्रमादरम्यान गडावर हिंडताना इतिहास अभ्यासक सभासदांना दुर्गांची बलस्थाने व दुर्गांचा इतिहास उलगडून दाखवितात आणि प्रश्नोत्तरादरम्यान शंकांचे निरसन केले जाते. त्या कार्यक्रमाद्वारे राजगड, रायगड, पुरंदर, प्रतापगड, शिवनेरी-नाणेघाट, सुधागड अशा दुर्गांचा अभ्यास केला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील वेगवेगळया आदिवासी पाडयांवरील शाळांमधून शिक्षण घेणारी गुणी आदिवासी मुले साक्षरेतेसोबत सुसंस्कृतही व्हावी, म्हणून 'दुर्गसखा' त्या मुलांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवीत असतात. त्यामध्ये पाडयांपासून शाळेपर्यंतच्या प्रवासासाठी सायकली, बौध्दिक विकासासाठी शैक्षणिक सीडी आणि दूरदर्शन संच, संगणक साक्षरतेसाठी काही निवडक शाळांमध्ये संगणक, विद्यार्थी दत्तक योजना, सुमारे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शालेय लेखन साहित्य वाटप,दिवाळीत फराळ आणि फटाके यांचे वाटप, गावकऱ्यांच्या आग्रहाखातर ग्रंथालय, गरजूंना कपडेवाटप अशी अनेक समाजपयोगी कामे दुर्गसखामार्फत केली जात असतात.
शिवजयंतीप्रमाणेच राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव साजरा करणाऱ्याही काही संस्था आहेत. शिवअस्मिता या सामाजिक शिवप्रेमी संस्थेमार्फत राजमाता जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येतो. राजमाता जन्मोत्सव साजरा करण्याचे संस्थेचे हे दुसरे वर्ष. यंदाही या संस्थेमार्फत राजमातांचा जन्मदिन किल्ले कोरीगडावर मोठया उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. 4 जानेवारी रोजी मुंबईहून कोरीगडाकडे जाण्यासाठी शिवअस्मिता संस्था मार्गक्रमण करणार आहे. या निमित्त गडावरील मंदिरांची साफसफाई,सुशोभीकरण तसेच मंदिराच्या आवारातील परिसरात रांगोळीची आरास करून राजमाता जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
किल्ल्यांची जपणूक व संवर्धन करताना प्राचीन लेण्यांची जपणूक करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी डोंबिवलीतील पंकज समेळ या तरुणाने लेण्यांवर खास अभ्यास सुरू केलाआहे. 2006 साली सह्याद्री भ्रमण ग्रूपने राजगड, रायगड या किल्ल्यांवर जाऊन साफसफाईचा उपक्रम सुरू केला. गडकिल्ल्यांबाबत सध्या अनेक संस्था जागरूक झाल्या आहेत. अशा वेळी लेण्यांकडे लक्ष द्यावे म्हणून पंकजने आपला मोर्चा लेण्यांकडे वळविला. लेणी आणि किल्ले एकमेकांचा परस्पर संबध सांगत असतात. पुरातन काळातील लोकांचे राहणीमान, आभूषणे हे शिल्पात रेखाटण्याची कला वाखाणण्याजोगी आहे. यासाठी अभ्यासवर्ग घेऊन लेण्यांचे माहात्म्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचा पंकजचा मानस आहे.
या ऐतिहासिक वास्तूंची जपणूक झाली, स्थानिक याबाबत जागरूक झाले, तर पर्यटन मार्गदर्शक, स्थानिक दुकानदार यांना यातून रोजगार मिळू शकेल. गडांवरील कचरा, अस्वच्छता ही गंभीर समस्या होत आहे. पुरात्तत्व विभागाच्या कालबाह्य अटींचा फेरविचार व्हायला हवा. असे झाले तर स्वयंसेवी संस्थांना गडसंवर्धनाचे काम सजगतेने करता येईल. पर्यटकांनी गडकिल्ल्यांवर स्वच्छता ठेवायला हवी, मंदिराप्रमाणे गडाचे पावित्र्य जपायला हवे. बहुतांश किल्ल्यांची पडझड झालेली सध्या दिसून येते व त्याकडे पुरातत्त्व विभागाचे झालेले दुर्लक्षही तेवढेच कारणीभूत आहे, असे काही गडप्रेमींचे गाऱ्हाणे असते. पण एखादी ऐतिहासिक वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती वास्तू कोणत्या कालखंडात बांधली आहे, त्याच्या जतनासाठी कोणत्या प्रकारचे बांधकाम योग्य असेल याचा सारासार विचार करणे ही तितकेच गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक अरविंद जामखेडकर यांनी व्यक्त केले. स्मारक दत्तक
योजनेअंतर्गत स्वयंसेवी संस्था अशी कामे करू शकतात. काही किल्ल्यांसाठी लागणारा निधी केंद्रातून येत असतो, तर काही किल्ल्यांवर राज्य सरकारचे नियंत्रण असते. एखाद्या वास्तूच्या डागडुजीसाठी व पुनर्बांधणीसाठी लागणारा निधी विशिष्ट खात्यात जमा करुन त्यावर संबंधित विभाग काम करतो किंवास्थापत्य विभागाकडे हे काम सोपविले जाते. सरकार, स्थानिक माणसे काय करतात यापेक्षा आम्ही वेळात वेळ काढून गडकिल्ल्यांना भेटी देऊन तिथे स्वच्छता, डागडुजी करतो, असे सामाजिक संस्थांचे सांगणे आहे. पुरातत्त्व विभागाने अशा सेवाभावी मंडळींची मदत घेत कार्य चालू ठेवले, तर या ऐतिहासिक वास्तूंची आपल्याला जपणूक करता येईल.
9773770507
एखादी ऐतिहासिक वास्तू दुरुस्त करायची असेल तर ती वास्तू कोणत्या कालखंडात बांधली आहे, त्याच्या जतनासाठी कोणत्या प्रकारचे बांधकाम योग्य असेल याचा सारासार विचार करणेही तितकेच गरजेचे आहे. एखाद्या वास्तूच्या डागडुजी व पुनर्बांधणीसाठी लागणारा निधी विशिष्ट खात्यात जमा करून त्यावर संबंधित विभाग काम करतो किंवास्थापत्य विभागाकडे हे काम सोपविले जाते.
- अरविंद जामखेडकर (ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ आणि पुरातत्त्व विभागाचे निवृत्त संचालक)
