- .......आणि प्रोजक्ट फॅन्ड्री यशस्वी झालाच. आज सगळीकडुन टीम फॅन्ड्रीच कौतुक होतयं. टीम फॅन्ड्रीचा एक भाग असल्याने काही आठवणी ताज्या झाल्या त्या कागदावर उतरविण्याचा प्रयत्न केलायं. "टीम फँड्री" या नेटीझन ग्रुपने "प्रोजेक्ट फँड्री या उपक्रमाअंतर्गत "संवेदना सामाजिक बांधिलकीची" या टँग लाईनखाली हा सामाजिक बांधीलकीचा प्रपंच मांडला. ६ जुलै रोजी डहाणू कोटबी येथील खिंड पाडा या आदिवासी वस्तीवर ५५ स्वयंसेवकांनी भेट दिली. पाच जणांपासुन सुरुवात झालेल्या या प्रोजक्टला सोशल मिडीयामुळे दसपटीने कार्यकर्ते मिळाले. अनेक नव्या-जुन्या माणसांशी या निमित्ताने भेटीगाठी होत गेल्या, खुप गोष्टी नव्याने शिकायला मिळाल्या.
ज्या समाजातील संस्कारातुन आपण लहानाचे मोठे होत असतो त्या समाजासाठी काहीतरी करत असाव अस काहीस मनाला वाटत असत. समाजातील दुर्बल, मागसलेल्या बांधवाना समाजाच्या बरोबरीन चालता याव यासाठी आपलाही खारीचा वाटा असावा अस कॉलेजलाईफपासून वाटत आलयं. मग एन.एन.एसच्या माध्यमातुन समाजप्रबोधनात्मक पथनाट्य करणे, फुटपाथवर राहणार्या गरीब मुलांना महविद्यालयात आणुन शिकवण्याचा स्वप्नपुर्ती प्रोजेक्ट असो, किंवा बदलापूर मधील आदीवासी पाड्यात सातत्याने काम करणे अशा काही कामांना एम.डी महाविद्यातुन सुरुवात झाली. पुढे करीअर व नोकरीच्यामागे फिरताना आपली आवड मागे राहते आहे काय अस वाटायला लागल पण अचानक एकदा रवी चाचे दादांचा फोन आला आणि ही चक्र मागे फिरु लागली. फॅन्ड्री सिनेमातील जब्याप्रमाणे अनेक जब्या आपल्या परीसरात असतात त्यांची नेहमीचे कपडे घालण्याची परीस्थितीही नसते या परीस्थितीवर आपल्याला काही काम करायच, अस दादांनी सांगितल. या माणसांपर्यंत जुने पण चांगले वापरातले कपडे पोहोचवायचे होते. विपुल पोरे, शशांक बोरे, प्रथमेश दिवेकर, मिलींद कांबळे अशा आम्हा पाच जणांवर ही प्राथमिक जबाबदारी होती. सोशल मिडीयाची मदत घेवुन आम्ही प्रोजेक्ट फॅन्ड्रीचा श्रीगणेशा केला.
आणि प्रोजेक्टला सुरुवात झाली....
मुंबईपासुन जवळच्या अंतरावर अनेक आदीवासी पाडे असे आहेत जिथे माणसांना अंग झाकण्यासाठी लागणार्या कपड्यांसाठी ही खुप खस्ता खाव्या लागतात. तर दुसर्याबाजुस आपल्याकडे अशीही अनेक मंडळी असतात की कपडे वापरुन जुने झाले की भांडीवाले किंवा चिंधीवाले यांना देउन छोटीमोठी भांडी घेत असतात. अशा जुन्या पण चांगल्या कपड्यांचा चांगला उपयोग करत हे कपडे आदीवासी पाड्यातील नागरीकांपर्यंत पोहोचविण्याचे काम आम्हाला करायचे होते. हळुहळु ही संकल्पना सर्वांना आवडली. एक चांगला अनुभव म्हणजे कोणाच्याही घरातुन फाटलेले,खराब कपडे मिळाले नाहीत. समाजकार्याचा भाग म्हणुन जबाबदारीने प्रत्येकाने धुवुन स्वच्छ केलेले कपडेच आमच्यापर्यंत टिमपर्यंत पोहोचवले. काही समाजसेवकांनी पुढे येत आर्थिक मदत केली. प्रोजेक्टसाठी कपडे आणि आर्थिक मदत मिळायला हळुहळु सुरुवात झाली. काही आदीवासी पाड्यात अनेक सेवाभावी संस्था पोहोचत असतात, ही मिळालेली मदत अशा भागात पोहोचवायची होती जिथे खरोखर गरज होती किंवा कोणतीही संस्था तिथे पोहोचत नसावी. सोशल मिडीयाच्या माध्यमातुनच काही संपर्क मिळाले आणि डहाणु येथील कोटबी या आदीवासी पाड्याच नाव कळाल. एका रविवारी कोटबीला जायच ठरल. दत्ताराम वळवणकर दादा, पंकज राणे, शशांक बोरे, आकाश शिंदे अशी आम्ही मंडळी डहाणुला पोहोचलो. तिथल्या एका डॉ. परहाड या समाजसेवकांशी संपर्क होता पण खास अशी ओळख नव्हती.
पाड्याच्या शोधात टिम फॅन्ड्री....
ग्रामपंचायती पासुन पुढे थोड्या अंतरावर हा आदीवासी पाडा होता, जिथे आम्हाला समाजकार्य पोहोचवायच होत. रावते सरांनी कोटबी, खिंडपाडाची प्राथमिक शाळा दाखविली जिथे 1 ते 4 थीचे विद्यार्थी शिकत होते. कपडे वाटप करणे हा मुख्य हेतु होता पण या निमीत्ताने काही आर्थिक मदत ही मिळत होती जिचा चांगला उपयोग आम्हाला करायचा होता. शाळेतल्या मुलांच्या प्राथमिक गरजांचा अंदाज आम्ही घेतला. शेती सोडुन तिथल्या लोकांना फारस वेगळ उत्पन्न नाही. त्यामुळे पोटापाण्यासाठी ही माणस सतत स्थलांतर करत असतात. जवळच एक आश्रमशाळा आहे जिथे 268 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना वह्या-पुस्तके व कब्बडी, खोखो या खेळांसाठी खेळाच्या कपड्यांची गरज होती, शाळेला कुंपण नव्हत. अशा अऩेक गोष्टी कोटबी गावासाठी करण्यासारख्या होत्या. प्राथमिक गरजांना प्राधान्य द्यायच म्हणुन मोठमोठी आश्वासन न देता शक्य होईल तेवढी जास्त मदत करु असा शब्द आम्ही रावते सरांना दिला. आम्ही एक लिस्टच बनवली व टिम फॅन्ड्रीच्या सर्व मेंबर्ससमोर ठेवली. प्रदीप भालेकर सारखा खंदा कार्यकर्ता सोबत होता जो स्वतहाहुन अनेक जवावदारी घेत होता. एक ड्रेस कोड म्हणुन स्वखर्चाने टीशर्ट घालायची ठरल त्याची जबाबदारी दिपेश कांबळे ने घेतली. अनेक मंडळी ज्यांची नाव लिहायला जागा पुरणार नाही आणि कौतुक करुन मन भरणार नाही अशी माणस भेटत गेली. प्रत्येकाला समाजासाठी काहीतरी करायच होत त्याला प्रोजेक्ट फॅन्ड्री हे निमीत्त ठरल. सोशल मिडीयावरुन अनेक मंडळी एव्हाना स्वतहाहुन पुढे येत होती.
नागराज मंजुळेंची कौतुकाची थाप मिळाली....
प्रोजेक्ट फॅन्ड्री ही कल्पना फॅन्ड्री सिनेमामुळे पुढे आली होती. फॅन्ड्री सिनेमा हा पौगांडावस्थेतील मुलाची प्रेमकथा म्हणुन सर्वत्र गाजला पण यात समाजापासुन दुर्लक्षित असलेल्या समाजाचे चित्रणही तितक्याच ताकतीने चित्रित केले आहे. सिनेमाचे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या कानावर टिम मेंबर दक्षता ठसाळेने प्रोजेक्ट फॅन्ड्रीची ही संकल्पना मांडली. एका कार्यक्रमासाठी नागराजजी मुंबईत येणार होते.त्यांनी आम्हाला तिथे भेटण्यासाठी वेळ दिला. खुप शांत स्वभावाचा, कवी मनाचा ग्रेट माणुस आमच्यासमोर उभा होता. खुप शांततेने त्यांनी संकल्पना ऐकली. महात्मा फुले, ज्योतीबाई फुले अशी पुस्तके वाचा असा प्रेमळ सल्ला त्यांनी दिला, प्रोजक्टला खुप शुभेच्छा दिल्या. आता टिम फॅन्ड्रीचा आत्मविश्वास अजुनच वाढला होता. नागराज मंजुळे टिम फॅन्ड्रीला भेटल्याची बातमी खुप पसरली. लोकमत, पुढारी, मुंबई चौफेर अशा आघाडीच्या वर्तमान पत्रात छापुन आली. प्रोजेक्ट फॅन्ड्री या फेसबुक लाईक पेजला बनविल्यावर काही दिवसातच पाचशे लाईक्स मिळाले ही संख्या वाढतच होती. सगळ कस गुडी गुडी घडायला लागल.




छान बातमी आहे
ReplyDelete