Wednesday, 17 September 2014

यशस्वी होण्याचा राजमार्ग चला… यशस्वी होऊ या!

****प्रवीण दाभोळकर*****
पुस्तकाचे नाव : चला… यशस्वी होऊ या!
लेखक : सी.ई. पोतनीस
प्रकाशन : अमेय इन्स्पायरिंग बुक्स, पुणे
मूल्य : 160/- रु.  l  पृष्ठ : 132
आयुष्याच्या या स्पर्धेत यशस्वी व्हायचे स्वप्न प्रत्येकाने उराशी बाळगलेले असते. पण यातील काही जणांनाच यशाचे शिखर गाठणे शक्य होते. जीवनाप्रती आपली असलेली तळमळ, संस्कार, समाज, निश्चित ध्येय, उद्दिष्ट, सातत्य, मेहनत करण्याची तयारी अशा गोष्टी आपल्या यशाला कारणीभूत ठरत असतात. या गोष्टींवर विचार करता न आल्याने प्रामुख्याने तरुण मंडळी गोंधळलेल्या, द्विधा मनःस्थितीत असतात. ‘चला… यशस्वी होऊ या’ या पुस्तकाचे लेखक सी.ई. पोतनीस यांनी तरुणांची हीच मनःस्थिती ओळखून त्याच्याशी सुसंगत लेखन केले आहे. यात लिहिले गेलेले लेख लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभवातून आल्याने त्याला वास्तवाचा स्पर्श आहे. पोतनीस यांना भारतात व परदेशात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. सीईओ या पदावर बारा वर्षांहून अधिक काळ यशस्वीपणे काम करत त्यांनी अनेक आस्थापनांचे नेतृत्व केले आहे. तसेच शारीरिक, मानसिक व नातेसंबंधातील समस्यांवर ते इतरांना मदत करतात. याशिवाय करिअर व आयुष्यावरील समस्यांवर ते चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतात. लेखकांना आजवर भेटलेल्या माणसांचा बरा-वाईट अनुभव, मार्गदर्शन, माणसे वाचण्याची चिकित्सक वृत्ती या सर्वांची शिदोरी या पुस्तकातून अनुभवायला मिळेल.
आपल्या प्रत्येकातच काही ना काही गुण असतात. पण न्यूनगंड व कमतरतेची भावना यामुळे ते गुण लुप्त होतात. लेखकही याच अनुभवातून गेला होता. पण त्यातून लेखकाला जगण्याचा वेगळा दृष्टिकोन प्राप्त झाला आहे, जो लेखणीतून उतरलेला दिसतो. ज्या न्यूनगंडामुळे आयुष्य समजायला वेळ जातो, त्या न्यूनगंडाचे आपण भक्ष्य न होता आपण आपली सकारात्मक ताकद ओळखत तिची व्याप्ती वाढविली पाहिजे. त्यामुळे ‘न्यूनगंड : शिकार नव्हे, शिकारी व्हा’ असा लेखच पुस्तकाची सुरुवात करतो. नेतृत्व आणि व्यवस्थापनातील गुण आपल्यात असल्याचे कालांतराने लेखकाच्या लक्षात आले, तसेच सकारात्मक विचार, मानसशास्त्र, अध्यात्म या विषयांची गोडीही याच दरम्यान लागली. संमोहनशास्त्राचा अभ्यासक्रमही शिकून झाला होता.
प्रत्येक तरुणामध्ये विविध गुण असतात. तरीही अनेकांना यश सतत हुलकावणी देत असते. जीवनाविषयी असलेल्या चुकीच्या समजुतीमुळे अनेक तरुणांना मार्गदर्शनाची असलेली गरज या पुस्तकाच्या वाचनाने पूर्ण होते. आपले यश हे केवळ आपलेच नाही, आपल्या यशाला असंख्य चांगल्या-वाईट प्रसंगांचा व व्यक्तींचा हातभार लागला आहे याची जाणीव असल्याने आयुष्याचे ध्येय विस्कटलेल्या तरुणांसाठी काम करण्याचे लेखकाने ठरविले. आईवडिलांपासून सुरू होऊन आपल्या आयुष्याच्या प्रवासात कळत-नकळत भेटलेल्या व्यक्ती, घटना, प्रसंग यांना लेखक सी. ई. पोतनीस आपल्या पुस्तकाचे श्रेय देतात.
आपल्या यशाची व्याख्या काय? हे प्रत्येकाने प्रथम मनाशी पक्के करायला हवे. कारण उत्तम शिक्षण व अनेक गुण असूनही आपण आयुष्य जगलो असे बऱ्याच जणांना वाटत नाही. यासाठी ध्येय निश्चित करणे, त्यासाठी ध्येयाचे महत्त्व पटवून घेणे महत्त्वाचे आहे. चांगली संधी मिळाली नाही, म्हणून आयुष्यात प्रगती करता आली नाही अशी काही जण ओरड करत असतात. आव्हानांना सामोरे गेल्यावरच संधी निर्माण होते. बऱ्याचदा यश व अपयश हे या दृष्टिकोनातील बदलानेच कळते. येणाऱ्या आव्हानांना आपण काय प्रतिसाद देतो, यावर परिणाम अवलंबून असतो. त्यामुळे लेखकाच्या मते आपल्या आव्हानांमध्ये संधी शोधण्याचा दृष्टिकोन किती आहे, यावर बरेच काही अवलंबून असते. प्रत्येक यशोगाथा या अपयशाच्या कहाण्या असतात. यशस्वी होण्याचा रस्ता अपयशाची आडवळणे घेऊनच आलेला असतो.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच यशस्वी आणि आनंदी जीवनासाठीची अष्टसूत्री चित्राच्या साहाय्याने रेखाटली आहे. पुस्तक हातात आल्यावर आधी मुखपृष्ठावरच लक्ष केंद्रित होते व आपण मुखपृष्ठाशी स्वत:ला तपासून पाहू लागतो. मलपृष्ठावर लेखकाच्या भारदस्त परिचयासोबत मुखपृष्ठाशी सुसंगत अशी मुद्देमांडणी केलेली आहे.
9773770507

No comments:

Post a Comment