Saturday, 21 December 2013

‘होरायझन’ची कीर्ती



      कीर्ती महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या होरायझन फेस्टिव्हलची कॉलेज विश्‍वात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गेमिंग व इतर हटके स्पर्धांची धमाल, विद्यार्थ्यांचा सळसळता उत्साह आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांच्या सोबत कीर्तीचा होरायझन फेस्ट दणक्यात झाला. मनोरंजनातून शिक्षण ही होरायझनची विचारसरणी अनेक स्पर्धांमधून दिसून आली. ACCENTURE कंपनीचे सुबोध सुर्वे आणि आशिया फिल्म फेस्टिव्हलमध्ये निवड झालेल्या दप्तर चित्रपटाच्या कलाकारांनी उद्घाटन सोहळ्याची शोभा वाढविली. सुबोध सुर्वेंनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी उलघडून सांगितल्या तर दप्तर चित्रपटाचे दिग्दर्शक पुंडलिक धुमाळ व अभिनेते यश शहा, अभय कामत यांनी गप्पांमधून दप्तर चित्रपटाची कथा व फेस्टिव्हलपर्यंतचा प्रवास सांगितला.                होरायझनमधील ट्रेजर हंट, वन मिनीट गेम, डीजे मिक्सिंग या स्पर्धांना तरुणांनी चांगलीच पसंती दिली. कॉलेजिअन्समधील गेमिंगची क्रेझ पाहता लॅन गेमिंग, मोबाईल गेमिंग तसेच मारीओ, रोडरॅश या स्पर्धांमध्येही विद्यार्थ्यांचा उत्साह विलक्षण होता. काही दिवसांत खुद्द कीर्ती महाविद्यालयात चित्रीकरणास सुरुवात होणार्‍या राजभाषा चित्रपटाची टीम विद्यार्थ्यांच्या भेटीला आली होती. दिग्दर्शक ज्ञानेश्वर मर्गज, अभिनेत्री विशाखा, संगीतकार कौशल ईनामदार यांच्याशी दिलखुलास गप्पा मारण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. होरायझनने मुंबईत सर्वप्रथम टेकफेस्टची सुरूवात केली असे मानले जाते.              तरुणांची गेमिंग मधील दिवसेंदिवस वाढती क्रेझ लक्षात घेऊन कीर्ती महाविद्यालयाने या वर्षीचा होरायझन रीवॉल्यूशन ऑफ गेमिंग या थीमवर आधारित होता. महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाने सुरू केलेल्या होरायझनने सर्वांना आपलंस केलंय, असे म्हणत प्राचार्य मगरे सरांनी कौतुकाने पाठ थोपटली तर होरायझनने आज मला कीर्तीची नवी ओळख पटवून दिल्याचे संगीतकार कौशल इनामदार यांनी सांगितले.

- प्रवीण दाभोळकर

No comments:

Post a Comment