माध्यम महोत्सवाची धूम
माध्यम महोत्सवाची धूम


साठ्ये कॉलेजच्या मास- मीडिया विभागातर्फे ‘माध्यम महोत्सव - जत्रा माध्यमांची’ या संकल्पनेवर आधारित महोत्सव नुकताच साजरा झाला. महाविद्यालयाच्या पटांगणात सळसळत्या तरुणाईच्या साक्षीने, लोककलाकारांच्या उपस्थितीत पारंपरिक लोककलांचा जागर करण्यात आला. दोन दिवस रंगलेल्या या महोत्सवात मीडिया तसेच कला क्षेत्रातल्या दिग्गजांची उपस्थितीही दिसून आली.बदलत्या काळाप्रमाणे माध्यमांच्या धोरणांमध्ये खूप मोठा बदल जाणवतो. फक्त समाजप्रबोधन हे एकमेव उद्दिष्ट न राहता नव्या पिढीच्या विचारसरणीचा प्रभाव माध्यमांवर दिसून येतो. त्यामुळे माध्यम म्हणजेच मीडियाला आधुनिक वलय निर्माण झालं आहे. त्यामुळेच लोककलेसारखे प्रभावी माध्यम आता पुसट होताना दिसतेय. या लोप पावत चाललेल्या माध्यमांचा, पारंपरिक लोककलांचा जागर साठ्ये कॉलेजच्या मास- मीडिया विभागातर्फे ‘माध्यम महोत्सव - जत्रा माध्यमांची’ यानिमित्ताने करण्यात आला.या मजेशीर जत्रेत स्वस्तातल्या सिनेमाचा तंबू,तमाशाचा फड,भारुड,कीर्तन, लावणी,गवळण,मंगळागौर खेळ,गोंधळ,दिंडी याशिवाय हिंदुस्थानातील पारंपरिक लोककलांची माहिती प्रदर्शन भरवण्यात आले होते. याव्यतिरिक्त डोंबार्याचे खेळ, झटपट मेहंदी,जत्रेतला फोटो स्टुडिओ,आकाशपाळणा,म्हातारीचे केस,स्वस्तात मस्त वस्तू,बर्फाचे गोळेवाला,आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल्सदेखील ठेवण्यात आले. लोककला अकादमीचे योगेश चिकटगावकर,झी मराठीचे वरिष्ठ कार्यकारी निर्माते नीलेश मयेकर आणि पटकथाकार ह्रषिकेश कोळी यांची प्रमुख उपस्थिती महोत्सवाला लाभली. तसेच मराठी मास मीडिया असलेल्या कॉलेजच्या प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी देखील जत्रेला भेट दिली. पारंपरिक माध्यमे जत्रेच्या माध्यमातून सादर करण्याचा साठ्येच्या मास-मीडिया विभागाचा प्रयत्न वाखाणण्याजोगा होता.
-प्रवीण दाभोळकर
No comments:
Post a Comment